मुद्द्याची गोष्ट – योगिनी वेंगुर्लेकर (कथासंग्रह)

योगिनीताईंच्या लेखनाची ओळख मला विख्यात लेखिका सरिताताई आठवले यांनी करून दिली. त्यांच्या पुस्तकांचे आणि कथांचे वाचन करत असताना मला असे जाणवले की त्या अत्यंत समकालीन लेखिका आहेत. त्या आधुनिक शब्दसंपत्तीचा वापर करतात, त्यांच्या कथांतील व्यक्तिरेखा आणि वातावरण देखील आधुनिक आहे, आणि त्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत सुसंगत व सहज अनुभवता येण्यासारखे वाटते. त्यांच्या कथा मला नेहमीच वेगळा दृष्टिकोन देतात.

आज मी त्यांच्या ‘मुद्द्याची  गोष्ट’ या कथासंग्रहाबद्दल लिहिणार आहे.

हा कथासंग्रह विविध व्यक्तिरेखा आणि वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये घडणाऱ्या त्या व्यक्तीरेखांच्या आयुष्यांचा वेध घेतो. कथासंग्रह ही संकल्पना मला आकर्षक वाटते, कारण एकाच पुस्तकातून अनेक कथा अनुभवण्याची संधी मिळते. अशा कथा आपल्याला नव्या वातावरणांचा अनुभव देतात, जे अन्यथा आपण कधीच अनुभवू शकलो नसतो.

लेखिकेच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला मी मनापासून सलाम करते. त्यांच्या सर्जनशीलतेमुळे केवळ व्यक्तिरेखा उभ्या राहत नाहीत, तर कथानुरूप उभ्या केलेल्या त्या त्या विशिष्ट सामाजिक स्तरासाठी वापरली जाणारी एक वेगळी शब्दसंपत्तीही तयार होत असते.

‘मुद्याची गोष्ट’ या पहिल्या कथेत एक लेखक, एक प्रकाशक आणि विशेष म्हणजे लेखकाने स्वतः निर्माण केलेली एक व्यक्तिरेखा – अशी पात्रांची मांडणी आहे. ही कल्पना अत्यंत रोचक आहे. या कथेत लेखिकेने कथेतील लेखिकेचे संघर्ष, तिची महत्त्वाकांक्षा, तसेच तिच्या चिंता आणि असुरक्षितता अत्यंत प्रभावीपणे मांडल्या आहेत. या गोष्टीतली लेखिका तिने निर्माण केलेल्या व्यक्तिरेखेशी, तिच्या स्वतःशी आणि तिच्या प्रकाशकाशी सतत संघर्ष करत असते असे दाखवले आहे. तिला स्वतःच्या सर्जनशीलतेशीही झुंज द्यावी लागते, हे किती मोठे आव्हान आहे! या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी ही कथा वाचणे आवश्यक आहे. शेवटी या संघर्षात नेमके कोण जिंकते, लेखक, प्रकाशक की ती व्यक्तिरेखा? आणि हा संघर्ष नेमका कशासाठी आहे?

‘एक कप काहवा’ ही कथा अत्यंत प्रभावी असून ती आपल्याला आपण इतर लोकांबद्दल करत असलेल्या विचाराविषयी आणि आपला त्यांच्या आयुष्याबद्दल असलेल्या दृष्टिकोनाविषयी पुनर्विचार करायला भाग पाडते. ही कथा पिढ्यान्‌पिढ्यांतील भावनांचा अत्यंत हृदयस्पर्शी वेध घेते.

‘लोककथा फ्रॉम कलियुग’ ही कथा एका विलक्षण आणि अजब वातावरणात घडते; परंतु तिचा केंद्रबिंदू गुंडी आणि त्याचे वडील यांच्यातील नातेसंबंध असा आहे. देशभक्तीविषयी त्यांच्यात होणारे संवाद वाचताना विशेष रस निर्माण होतो.

‘फ्रॅक्चर्ड सोल्स’ या कथेचे शीर्षकच वाचकाचे लक्ष वेधून घेते.  दूरचित्रवाणी मालिकांसाठी लेखन करणाऱ्या एका लेखकाच्या भावनिक उलथापालथींचा यामध्ये मागोवा घेतला आहे. निर्माते, अभिनेते, लेखक इत्यादींच्या विश्वावर ही कथा प्रकाश टाकते. एका लेखकाला नेमके कोणकोणते अनुभव घ्यावे लागतात, याचा यात सखोल विचार आहे.

‘बाईच्या जातीला..’ या कथेत एका कष्टाळू आईची झुंज दाखवली आहे. जीवनाच्या कटू अनुभवांमुळे प्रगल्भ झालेली एक आई, आपल्या कमी समज असलेल्या तरुण मुलीला जीवनातील कठोर वास्तवांना सामोरे जाण्यास कसे तयार करते, तिच्या काळजीने कशी व्याकुळ होते हा सगळा प्रयत्न या कथेमध्ये दिसतो.

‘गुंता’ या कथेत एक मुलगी पूर्वी तिच्या आईसोबत झालेल्या संवादांची आठवण काढते. हे संवाद अनेकदा कटू होते, म्हणून ती त्यांना तेव्हा नापसंत करत असे; परंतु आता ती त्याच आठवणींनी व्याकुळ होते आहे. माझ्या मते, आपण एका विशिष्ट वयात असताना आपल्या वागणुकीचे भान ठेवत नाही; परंतु आयुष्य जसे पुढे सरकते, तसे मागे वळून पाहताना आपण आपल्या कृतींचा आणि प्रतिक्रियांचा विचार करु लागतो. तेव्हा मनात खंत निर्माण होते; पण तोपर्यंत वेळ हातातून निसटून गेलेली असते.

‘जन्म आपुला’ ही कथा मुलांनी आपल्या वडिलांना माफ करण्याच्या शक्यतेचा शोध घेते. पालक आपल्या मुलांच्या चुका हजारो वेळा पोटात घेतात, हे सर्वज्ञात आहे; परंतु मुलांनाही तसे करता येते का हा प्रश्न ही कथा अत्यंत संवेदनशीलपणे उभी करते.

सर्व कथांमध्ये लेखकाने समकालीन लेखनशैलीचा प्रभावी वापर केला असून, मराठीत रूढ झालेल्या काही इंग्रजी शब्दांचाही सहज आणि नैसर्गिकरीत्या उपयोग केला आहे. त्यामुळे भाषा अधिक जिवंत, बोलकी आणि आजच्या काळाशी जोडलेली वाटते.

***

search previous next tag category expand menu location phone mail time cart zoom edit close